नंदुरबार : सलग सत्ता भोगणाऱ्या आमच्या विरोधकांना नंदुरबार जिल्ह्यातील समस्या संपवणारा विकास मागील अनेक दशकात करता आला नाही. माझ्या खासदारकीच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात त्यातील बहुतांश विकास कामे केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्हाला करता आली. आता निवडणुकीला सामोरे जाताना लोकांना सांगण्यासारखे मुद्दे त्यांच्या काँग्रेससह कोणत्याही विरोधकांच्या हाती राहिलेले नाहीत आणि म्हणूनच त्यांनी खोटं बोलून लोकांची दिशाभूल करणे चालवले आहे. अशा शब्दात डॉ. हिना गावित यांनी विरोधकांना जाहीर उत्तर दिले.
शहादा तालुक्यातील सावळदे येथे 28 रोजी रात्री आठ वाजता लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार सोहळा महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी डॉक्टर हिना गावित बोलत होत्या.
या सत्कार निमित्त पार पडलेल्या सभेला नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजय चौधरी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जे पी एन सहकारी सूतगिरणीचे चेअरमन दीपक बापू पाटील, पूज्य साने गुरुजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मकरंद भाई पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष जे एन पाटील, विधानसभा मतदार संघ प्रमुख महेंद्र भाई पटेल, शहाद्याचे ईश्वरभाई पाटील, प्रकाशाचे विजू भाई पाटील, जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील यांच्यासह शहादा तालुक्यातील विविध गावाचे सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.