विरोधकांमध्ये फुट; नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ४ विरोधी पक्षाची उपस्थिती

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. मात्र नवीन संसद भवनाचे उद्धाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करावे, अशी मागणी करत विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. आतापर्यंत १९ विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. मात्र चार विरोधी पक्षांनी या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचे जाहीर केले आहे.

या सोहळ्यासाठी पंजाबमधील राजकीय पक्ष अकाली दल सहभागी होणार आहे. त्याशिवाय ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा वायएसआरसीपी पक्षही उद्घाटन सोहळ्याला उपस्थित असणार आहे. उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यादेखील नवीन संसद भवनाच्या वास्तू उद्घाटन सोहळ्याला हजर राहतील.

संसद हे लोकशाहीचे मंदिर असल्याने आपल्या देशाचं प्रतिबंब करते. ही वास्तू देशातील प्रत्येक नागरिकाची आणि प्रत्येक राजकीय पक्षाची आहे. अशा वास्तूच्या उद्धाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हे लोकशाहीच्या भावनेला अनुसरून नसणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन या सोहळ्याला हजेरी लावायला हवी, अशी भुमिका वायआरएस काँग्रेसकडून मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ट्विट करुन मांडली आहे.

या राजकीय पक्षांनी टाकला बहिष्कार
आतापर्यंत १९ विरोधी पक्षांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. या पक्षांमध्ये काँग्रेस, द्रमुक (द्रविड मुनेत्र कळघम), आप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), समाजवादी पक्ष, सीपीआय, जेएमएम, केरळ काँग्रेस (मणी), विदुथलाई चिरुथाईगल काची, आरएलडी, टीएमसी, जेडीयू, एनसीपी, सीपीआय(एम), आरजेडी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी आणि मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (एमडीएमके).