नवी दिल्ली : भाजपविरोधी आघाडीसाठी विरोधी पक्षांची बैठक आता १७ आणि १८ जुलै रोजी बंगळुरू येथे होणार आहे. या बैठकीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतल्याचे पडसाद उमटणार आहेत.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात एकत्रितपणे लढण्याची तयारी विरोधी पक्ष करत आहेत. त्यासाठी पटना येथे पहिली बैठक पार पडली होती, आता येत्या १७ आणि १८ जुलै रोजी कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे ही बैठक होणार आहे.
या बैठकीमध्ये किमान समान कार्यक्रम तयार करण्याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ही बैठक शिमला येथे आयोजित करण्यात आली होती. विरोधी पक्षांच्या या बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी ताब्यात घेण्याच्या घटनेचे पडसाद उमटणार आहेत. विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी शरद पवार हे सक्रिय आहेत, त्यांनीच पुढाकार घेऊन डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आदी परस्पर विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते.
त्याचप्रमाणे राहुल गांधी, नितीश कुमार, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी आदी नेत्यांनीदेखील शरद पवार यांच्याकडे किमान समान कार्यक्रम तयार करण्याची जबाबदारी दिल्याचेही सांगण्यात आले होते.
मात्र, आता शरद पवार यांच्याकडून अजित पवार यांनी पक्षच हिसकावून घेतला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये शरद पवार यांना कितपत वाव मिळेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.