संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत असून, हे अधिवेशन २२ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. यंदाचे अधिवेशन हे नवीन संसद भवनात पार पडणार आहे. विशेष अधिवेशनाच्याकाळात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण ५ बैठका होतील.
या अधिवेशनात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांतील देशाच्या कामगिरीपासून ते संविधान सभेपर्यंत सर्व गोष्टींवर चर्चा होणार आहे. विषयपत्रिकेत चार विधेयकेही मंजूर करण्याचा प्रस्ताव आहे. संसदेच्या विशेष सत्राच्या पहिल्या दिवशी १८ सप्टेंबर रोजी राज्यसभेमध्ये ‘संविधान सभेपासून ७५ वर्षांत संसदेचा प्रवास, काय साध्य केले. अनुभव, आठवणी आणि शिकवण’ यावर चर्चा होईल. त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावरही चर्चा केली जाणार आहे. तसेच चांद्रयान-३ आणि जी-२० शिखर परिषदेबद्दलचे प्रस्तावही मांडले जातील.याशिवाय संसदेच्या या विषेश अधिवेशनाच्या दरम्यान, G20 शिखर परिषदेचं यश, चांद्रयान-3 आणि स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दलही चर्चा होऊ शकते. ‘वन नेशन वन इलेक्शन’ आणि देशाचे नाव ‘इंडिया’ वरुन ‘भारत’ करण्याचा प्रस्तावही या अधिवेशनात आणला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या अधिवेशनातील प्रस्तावित चार विधेयकांमध्ये अधिवक्ता (सुधारणा) विधेयक, वृत्तमाध्यमे आणि नियतकालिके नोंदणी विधेयक २०२३, पोस्ट ऑफिस विधेयक आणि मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त विधेयक (नियुक्ती, सेवा शर्ती आणि पदाचा कालावधी) यांचा समावेश आहे. राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर लोकसभेत या विधेयकांवर चर्चेनंतर मंजुरी घेतली जाईल.संसदेच्या या विशेष अधिवेशनाच्या काळात सामान्यपणे सकाळी ११ पासून दुपारी एक आणि दुपारी दोन ते सायंकाळी सहापर्यंत कामकाज चालेल. विशेष सत्रामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये प्रश्नोत्तरांचा कालावधी नसेल. तसेच अशासकीय विधेयक आदी कामकाज होणार नाही.
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या आधी केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसद भवन परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच विजय चौक परिसरात सर्वप्रकारची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.दुसऱ्या दिवसापासून नव्या संसद भवनात कामकाजसंसदेचे विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार असले, तरी पहिल्या दिवशीचे कामकाज हे जुन्याच संसद भवनात होणार असून, मंगळवार(ता. १९)पासून संसदेचे पुढील सर्व कामकाज हे नव्या संसद भवनात होणार आहे.