विहिरीत पडला बिबट्याचा बछडा; वनविभागाने असा वाचवला जीव

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील लोभणी येथे विहिरीत पडलेल्या एका बिबट्याच्या बछड्याला रविवारी वनविभागाने सुखरूप बाहेर काढले. येथील वसंत पाडवी यांच्या विहिरीत बिबट्याचा एक बछडा पडल्याचे आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास निदर्शनात आले.

संबंधित बछडा जीव वाचविण्यासाठी बराचवेळ धडपड करत होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपाल वासूदेव माळी, वनरक्षक डोंगरे, आशुतोष पावरा या वनविभागाच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत लोखंडी पिंजऱ्याच्या मदतीने बछड्याला विहिरीतून बाहेर काढले.

बिबट्याच्या बछड्यावर पशुवैद्यक अधिकारी  डॉ.दिनेश गावीत यांनी उपचार केले. वन विभागाच्या देखरेखखाली आणखी उपचार सुरु असल्याचे वनविभागाच्या पथकांनी सांगितले.