वीर खाजा नाईक यांच्या गावाला जाणाऱ्या रस्त्यासाठी खासदार डॉ. हिना गावितांनी घेतली केंद्रीय वन मंत्र्यांची भेट

वैभव करवंदकर
नंदुरबार  :
आदिवासी क्रांतिवीर तथा भिल समाजाचे राष्ट्रीय नायक खाजा नाईक यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या व समस्त आदिवासी बांधवांना तीर्थक्षेत्र समान असलेल्या शिरपूर तालुक्यातील बाटवापाडा या गावाला जाणारा रस्ता अनेक वर्षापासून दुर्लक्षित व प्रलंबित असून, वन खात्यातील आवश्यक प्रक्रिया वेगाने पार पाडून या कामाला न्याय द्यावा; अशी मागणी करणारे पत्र संसद महारत्न खासदार डॉ. हिना गावित यांनी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन सादर केले.

आदिवासी क्रांतिकारक वीर खाजा नाईक यांच्या स्मारकाचा तसेच त्या स्मारकापर्यंत रस्ता विकसित करण्याचा मुद्दा मागील आठवड्यात लोकसभा अधिवेशन चालू असताना शुन्य प्रहरात खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी मांडला होता. वीर खाज्या नाईक यांच्या जीवनाशी संबंधित बटवापाडा हे गाव धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यात आहे. 2012 पासून या रस्ता विकासाचे काम वन विभागा संबंधित प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने रखडले आहे.

समस्त आदिवासींच्या भावना लक्षात घेऊन या कामाला गती द्यावी; अशी मागणी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी मंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा करताना मांडली. याविषयी दिलेल्या अधिकृतपत्रात त्यांनी म्हटले आहे की,  M.D.R च्या बांधकामासाठी 9.90 हेक्टर वनजमीन वळविण्याच्या प्रस्ताव आहे. बटवापाडा ते काकडमाळ ते गवळीपाडा रस्ता बांधकामासाठी 3.10 हेक्टर वनजमिनीचाही प्रस्तावित आहे.

हे दोन्ही प्रस्ताव वन (संवर्धन) अधिनियम-1980 च्या कलम 2 अंतर्गत केंद्र सरकारच्या पूर्व मंजुरीसाठी सादर केले आहेत. मी आपणास विनंती करू इच्छितो की कृपया या प्रकरणात लक्ष घालावे, ते लवकरात लवकर पूर्ण करावे आणि कृपया वर नमूद केलेल्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी; असे असेही खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पत्रात म्हटले आहे.