नवी दिल्ली । देशात सर्वात स्वस्त आणि सोयीस्कर म्हटलं तर रेल्वेकडे पाहिलं जाते. याचमुळे देशात दररोज लाखोंच्या संख्येत लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र, देशातील रेल्वे प्रवाशांच्या झपाट्याने वाढणाऱ्या गर्दीने सरकारलाही सतर्क केले आहे.
वेटिंग लिस्ट संपुष्टात आणण्याबरोबरच सर्वांना कन्फर्म तिकीट देण्याच्या योजनेवर रेल्वे प्रशासन गांभीर्यानं विचार करत असून, रेल्वेने मोठी योजना आखली आहे. या योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत देशात 3 हजार नवीन गाड्या सुरू करण्याचे काम सुरू आहे.
सद्यस्थितीत वर्षभरात रेल्वेने ८०० कोटी प्रवासी प्रवास करतात. पुढच्या पाच वर्षांत प्रवाशांची संख्या एक हजार कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळं रेल्वेकडून विस्ताराची योजना आखल्याचे सांगण्यात येत आहे.
रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील विविध विभागाकडे सध्या 69000 हजार नवे डबे उपलब्ध असून दरवर्षी रेल्वे सुमारे पाच हजार नवीन डबे बनवत आहे. या सर्व प्रयत्नांमुळे, रेल्वे दरवर्षी 200 ते 250 नवीन गाड्या आणू शकते, जे 400 ते 450 वंदे भारत गाड्यांपेक्षा वेगळे आहे. येत्या काही वर्षांत या गाड्या रेल्वेत सामील होणार आहेत.
दरम्यान, कोरोना महामारीआधी 10186 मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर ट्रेन धावत होत्या. त्यात वाढ होऊन सद्यस्थितीत ही संख्या 10,748 वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, देशभरात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वेने या योजनेची तयारी केली आहे. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाची वेळ दोन ते पाच तासांनी कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.