मुंबई : राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय , आयुष,आयुर्वेद, योग, युनानी, सिध्द व होमिओपॅथी चिकित्सापद्धत अशा सर्व महाविद्यालयात डॉक्टर,रुग्ण आणि कर्मचाऱ्यांसाठी नियमित योग करण्यासाठी योग केंद्र सुरू करण्यात येणार असून त्याठिकाणी तज्ञ योग प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री गिरीश महाजन यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने घोषणा केली.
नॅशनल स्पोर्टस् क्लब, वरळी येथील डोम सभागृह वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या वतीने २१जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वसुधैव कुटुंबकम् साठी योग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, आयुक्त राजीव निवदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले,आजच्या या धावपळीच्या जीवनात माणूस हा आरोग्यापासून लांब होत चालला आहे. कोरोना सारख्या महामारीने आपल्याला चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे एवढे तर नक्की झाले आहे की, जर आपले शरीर निरोगी असेल तरच आपण आयुष्यातील सर्व गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. त्यासाठी आपले शरीर निरोगी असणे महत्त्वाचे आहे.योगाभ्यास व योगाची संपूर्ण पद्धती सर्वांना माहीत व्हावी तसेच जगभरात योगाचा प्रसार व्हावा या हेतूने दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2014च्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत केलेल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची घोषणा केली. पहिला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ 21 जून 2015 रोजी जगभरात साजरा करण्यात आला. ही भारत देशासाठी अभिमानाची बाब ठरली. प्रधानमंत्री मोदी यांच्या घोषणेमुळे आज ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे.जगातील १५० हून जास्त देश योग साधना करीत आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे जग आपल्याकडे आदर्श नजरेने पाहात आहे.श्री मोदींनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयामुळे देश सुपर पावर होण्याच्या मार्गावर आहे. विकसित व सर्वश्रेष्ठ राष्ट्र करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असल्याचे महाजन यांनी सांगितले.
मंत्री महाजन म्हणाले, आपल्या जीवनातील योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी जागतिक योग दिवस साजरा करण्यात येतो. योगा बद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी व लोकांनी योगाच्या माध्यमातून निरोगी राहावे हा याचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
योगासन हे केवळ व्यायाम नाही. तर हे आपले शरीर आणि मन दोन्ही जोडण्याचे साधन आहे. खरे आरोग्य तेच ज्यामध्ये शरीरासोबत मनही निरोगी राहते. योगा मुळे शरीरासोबत आपले मनही निरोगी राहते. योगामुळे असाध्य आजार देखील बरे होतात. याची खूप सरी उदाहरणे आहेत.उत्तम आरोग्य तसेच शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात.तणावमुक्त जगण्याबरोबरच तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो असे श्री महाजन यांनी सांगितले.
कैवल्य धाम संस्थेच्या योग मार्गदर्शकांनी उपस्थित मान्यवर आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून विविध योगासने करून घेतली.तसेच पोतदार वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी संगीत योगाचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या प्रास्तावित श्रीमती अश्विनी जोशी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सांगून २०२३ ची थीम वसुधैव कुटूंबकम् असल्याचे सांगितले. हर घर योगा,हर आंगण योगा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे योगा विषयीचे विचार शेवटच्या घटका पर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर,डॉ. अजय चंदनवाले,सहसंचालक विवेक पाखमोडे,प्रा.विदीराम घुंगराळेकर हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कुणाल रेगे यांनी केले.आभार वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवदकर यांनी मानले.