नवी दिल्ली । दर महिन्याच्या एक तारखेला गॅस सिलिंडर दरात बदल होत असतात. त्यानुसार आज एलपीजी गॅस सिलींडर दरात मोठा बदल करण्यात आला आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ३९ रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन दर रविवार म्हणजेच 1 सप्टेंबर 2024 पासून लागू झाले आहेत. यामुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे.
घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलींडरचे दर जैसे थे आहेत. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडर 1652.50 रुपयांहून 1691.50 रुपये झाली. यापूर्वी 1 जुलै रोजी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली होती, तेव्हा 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 30 रुपयांनी कमी करण्यात आली होती. तर ऑगस्ट आणि आता सप्टेंबरमध्ये तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या भावात वाढ केली आहे.
मात्र घरगुती LPG सिलेंडरचे मागील काही महिन्यापासून जैसे थे आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 803 रुपये आहे, तर कोलकातामध्ये 14 किलोचा सिलेंडर 829 रुपयांना विकला जात आहे. मुंबईत एलपीजीची किंमत 802.5 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडर 918.5 रुपयांना विकला जात आहे.