शरद पवारांनी काढले उध्दव ठाकरे व संजय राऊत यांचे वाभाडे

सातारा : राजकीय वारसदार निर्माण करण्यात शरद पवार अपयशी ठरले असल्याची टीका, खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून केली होती. त्यास शरद पवार यांनी जोरदार प्रतिउत्तर देत उध्दव ठाकरे व संजय राऊत यांचे वाभाडे काढले आहेत. यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेलं नसल्याचं पुन्हा एकदा सिध्द झालं आहे.

शरद पवार म्हणाले की, १९९९ साली आम्ही पक्षाची स्थापना केली, त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे संयुक्त सरकार करायचे होते तेव्हा नव्या सरकारमध्ये पक्षातील असे अनेक सहकारी होते ज्यांच्या आयुष्यात सत्तेचा पहिलाच प्रवास होता. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, आर आर पाटील. देशमुख होते अशी अनेक नावे आहेत. माझी सुरुवात राज्यमंत्री म्हणून झाली त्यानंतर प्रमोशन झाले. पण मी जी नावे घेतली त्यांची नियुक्ती कॅबिनेट मंत्री म्हणून झाली. त्या प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तत्व दाखवतो असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत आम्ही नेतृत्व तयार करतो, त्यामुळे कुणी आमच्याबद्दल लिहिले, हा त्यांचा अधिकार आहे परंतु आमच्या दृष्टीने त्याला किंमत नाही. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आम्हाला ठाऊक आहे आम्ही काय करतो त्यात आम्हाला समाधान आहे असं सांगत पवारांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर टीका केली.

राष्ट्रवादीत आम्ही काय केले ते त्यांना माहिती नाही. पक्षाचे सहकारी अनेक गोष्ट बोलतो, वेगवेगळी मतेही असतात पण ते बाहेर जाऊन प्रसिद्ध करत नाही. हा आमच्या घरातला प्रश्न आहे. आपला पक्ष पुढे कसा जाणार हे सगळ्यांना ठाऊक आहे. नवीन नेतृत्वाची फळी कशी तयार केली जाते हे पक्षातील सर्वांना माहिती आहे, असंही पवार म्हणाले.