मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वात मोठी बातमी समोर आली असून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला अध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटाकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्याकडून रोहिणी खडसे यांना प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीचं पत्र देण्यात आलंय. त्यामुळे रोहिणी खडसे यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे. याआधी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष या रुपाली चाकणकर होत्या. पण पक्षात फूट पडल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी अजित पवार यांना समर्थन देण्याचं ठरवलं. त्यानंतर शरद पवार यांच्याकडून त्यांच्या गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाल्या. त्यानतंर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर एकनाथ खडसे हे शरद पवार यांच्यासोबतच राहिले. आता रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचं शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलं आहे.