शरद पवार गटाची सहा जागांवरील संभाव्य नावे समोर ; रावेरमध्ये कोणाला संधी?

मुंबई । आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाची सहा जागांवरील संभाव्य उमेदवारांची नावे समोर आली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नुकतीच भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावं आहेत. मात्र या सगळ्यात महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. त्यात वंचित बहुजन आघाडी आपल्या प्रस्तावावर अडून बसली आहे. त्यामुळे मविआच्या जागा वाटपाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असताना शरद पवार गटाची सहा जागांवरील संभाव्य नावे समोर आली आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला सुटला आहे. त्यामुळे येथून एकनाथ खडसे किंवा त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपने रावेरमधून सध्याच्या विद्यमान खासदार रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. यातच शरद पवार गटाकडून त्यांच्या विरोधात स्वत: एकनाथ खडसे किंवा त्यांची मुलगी रोहिणी खडसे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे रावेरमध्ये सासरे विरुद्ध सून किंवा नणंद विरुद्ध भावजय अशी लढत रंगणार आहे.

शरद पवार गटाच्या सहा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे  

शरद पवार गटाच्या सहा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, रावेर – एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे, सातारा – श्रीनिवास किंवा बाळासाहेब पाटील आणि नगर दक्षिणमधून निलेश लंके यांचा समावेश आहे.