नंदुरबार : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन तब्बल एक महिना उलटूनही बंद आहे. बंद असलेल्या सीटीस्कॅन मशीनमुळे रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. बंद असलेले सिटीस्कॅन मशीनचा देखभाल दुरुस्ती ठेक्याच्या वादातून हे मशीन बंद आहे.
नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात सिटीस्कॅन मशीनची सुविधा गेल्या काही काळापासून सुरळीत सुरु असताना फेब्रुवारी महिन्यापासून खंड पडण्यास प्रारंभ झाला होता. परंतु यावर मात करत रुग्णालय प्रशासनाने दुरुस्त्या करून कामकाज सुरू ठेवले होते. जिल्ह्यात एकमेव सुसज्ज आणि मोफत अशी सिटीस्कॅन सेवा असल्याने याठिकाणी दर दिवशी रुग्णांची गर्दी होते.
महिन्याला सरासरी ४०० जणांचे सिटीस्कॅन केले जात असल्याने ही सेवा उपयोगी ठरत होती. मेंदूतील आजारांसह अपघातग्रस्तांचे सिटीस्कॅन केल्यानंतर तज्ज्ञांना उपचार करण्यात अडचणी येत नव्हत्या, परंतु गत एक महिन्यांपासून सेवा पूर्णपणे बंद झाल्याने रुग्णांना नंदुरबार शहरातील खासगी सेंटर्सवर जावे लागत आहे. याठिकाणी २ हजार ५०० रुपयांचा चार्ज द्यावा लागत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
रुग्ण नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था तसेच इतर खर्च वाढत असल्याने दुर्गम भागातील गोरगरिबांना आर्थिक फटका बसत आहे. यामुळे ही सेवा तातडीने सुरू करण्याची अपेक्षा आहे. बंद असलेले सिटीस्कॅन मशीन सुरु करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे यांनी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क मशीन दुरुस्त करुन देण्याचे केले. परंतु सूचित केले त्यांच्याकडून अद्याप दुरुस्तीसाठी कोणालाही पाठवण्यात आलेले नाही. या मशीनचे हस्तांतरण झाले असले तरी देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीचे हस्तांतरण नसल्याचे कारण देण्यात येत आहे.
दरम्यान, लवकरात लवकर सिटीस्कॅन मशीन सुरू करणार आहोत. शासनासोबत याबाबत पत्रव्यवहार केला आहे. रुग्णालयातील सर्व सुविधा पूर्ववत सुरु करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती डॉ. अरुण हुमणे यांनी दिली.