जळगाव : शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पाहून अनेक लोकांना पोटदुखी होत आहे. यावर उपाय म्हणून आम्ही लवकरच ‘डॉक्टर आपल्या दारी’ सुरू करणार आहोत. हा आमचा पब्लिसिटी करण्याचा प्रयत्न नाही. हे बसले अडीच वर्ष घरी, माहिती घेतात वरी वरी, पण आमच शासन जातयं घरोघरी, अशा शायराना अंदाजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पाचोरा शहरात शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपस्थिती लावल्यानंतर जनतेला संबोधित केले. जळगावमध्ये उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका केली होती. या टीकेला एकनाथ शिंदे यांनी शायराना अंदाजात प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे म्हणाले की, ‘हे बसले अडीच वर्ष घरी, माहिती घेतात वरी वरी, पण आमच शासन जातयं घरोघरी. लाभार्थ्यांना नेतंय स्टेजवरी, सामान्यांसाठी अहोरात्री काम करी, म्हणून लाखोंची गर्दी होते, कार्यक्रमावरी, ‘ अशा अंदाजात उद्धव ठाकरेंना उत्तर दिले आहे. शिवाय लोक उगाच शासना आपल्या दारी कार्यक्रमात येत नाहीत. ते घरी बसले आम्ही लोकांच्या दारी जात आहोत, आम्ही काम करतोय, त्याच गर्दी हे उत्तर असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, अजित दादा देखील विकासाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारसोबत आले. देशाला पुढे न्यायचं असेल तर नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही. राज्याला नरेंद्र मोदी यांचा नेहमी पाठिंबा राहतो. हे सरकार ‘शासन आपल्या दारी’ या माध्यमातून गतिमान झाले. अडीच वर्षे मागचे सरकार थांबले होते. आपण अनेक प्रकल्प सुरू केले. आपण महिलांना 50 टक्के, आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची योजना दिली. पीक विमा योजनेत एक रुपया भरून बाकी सर्व पैसे सरकार भरणार. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला अभिमान आहे आणि अडचणी यांची देखील जाण आहे. हे सरकार सर्व सामान्य लोकांना न्याय देणारे आहे. काही ठिकाणी पाऊस कमी पडलाय, ही वस्तूस्थिती असल्याचे शिंदे म्हणाले.