शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरणार की अपात्र? देवेंद्र फडणवीस म्हणाले; वाचा सविस्तर

वर्धा : शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वादावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरणार की अपात्र? या सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षचा निकाल लागेल अशी चर्चा आहे. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तासंघर्षाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

पत्रकारांशी बोलतांना फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच महाराष्ट्रातल्या काही राजकीय पंडित आणि काही पत्रकार यांनी निर्णय देऊन टाकला आहे. पुढचे कॉम्बिनेशनही करुन टाकले. सरकारंही तयार करून टाकली. मला असं वाटतं की हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय हे खूप मोठं न्यायालय आहे. शांतपणे निर्णयाची वाट बघावी. आम्ही पूर्णपणे आशादायी आहोत. काहीही होणार नाही. आम्ही जे काही केलं आहे ते सगळं कायदेशीर आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल अशी आमची अपेक्षा आहे.

दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी निकालावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप केला आहे. नार्वेकरांची केंद्रीय कायदामंत्र्यांबरोबर बंद दाराआड तीन तास बैठक झाली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार आहे हे त्यांना सांगण्यात आलं आहे का? असा सवाल संजय राऊतांनी केला. तसेच या बैठकीमुळे लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहे, असं राऊत म्हणाले.

राहुल नार्वेकरांची कायदामंत्र्यांबरोबर बंद खोलीत तीन तास बैठक झाली. या बैठकीत कायदा मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार हे राहुल नार्वेकरांना सांगितलं आहे का? सर्वोच्च न्यायालय असा निर्णय देणार आहे, तुम्ही लंडन दौर्‍यावर जा म्हणून राहुल नार्वेकरांना कायदा मंत्र्यांनी सांगितलं का?