तरुण भारत लाईव्ह न्यूज । नागपूर : मुंबईतील मालाड भागातील महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनला दिलेला म्हाडाचा भूखंड परत घेणे राज्य शासनाच्या विचाराधीन असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
मालाड येथील म्हाडाच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाबाबतचा प्रश्न सदस्य सुनिल शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता . त्याला उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, “मालाड (प) भागातील दादासाहेब गायकवाड नगर, मालवणी येथील बेस्ट डेपोलगतचा भूखंड १९९९ साली महाराष्ट्र पोलीस को.ऑप.हौसिंग फेडरेशनला दिला होता. ज्या कारणासाठी हा भूखंड दिला होता, तसा त्याचा उपयोग झाला नाही. विनावापर असलेला हा भूखंड परत घ्यायचा का, याबाबत राज्य शासन विचाराधीन आहे. या भूखंडावर अनधिकृतपणे होत असलेले भराव टाकण्याचे काम थांबवण्यात आले आहे. या प्रकरणी स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राप्त तक्रारीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील”, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर, विलास पोतनीस यांनी उपप्रश्न उपस्थित करुन सहभाग घेतला.