जळगाव : एरंडोल येथील शिक्षकाची धरणगाव येथे होणारी बदली रोखण्यासह शिक्षण विभागाकडे पाठवलेला प्रस्ताव रद्द करण्यासाठी 75 हजारांची लाच मागून ती मुख्याध्यापकांच्या नावाने धनादेशाद्वारे स्वीकारताना जळगाव एसीबीने तिघांना एरंडोलच्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये अटक केली. हा सापळा बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास यशस्वी करण्यात आला. सरस्वतीच्या ज्ञानमंदिरातच लाचेसाठी ‘एरंडोली’ करणार्या तिघांना अटक करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात पचंड खळबळ उडाली आहे. अटकेतील संशयितांमध्ये मुख्याध्यापक विनोद शंकर जाधव (42), वरीष्ठ लिपिक नरेंद्र उत्तम वाघ (44) व श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय पंढरीनाथ महाजन (56) यांचा समावेश आहे.
असे आहे लाचेचे ‘एरंडोली’ प्रकरण
पाचोरा येथील 40 वर्षीय तक्रारदार हे श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचलित एरंडोलच्या महात्मा फुले हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. त्यांच्यासह अन्य सहकारी शिक्षकाची धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूलमध्ये बदली करण्याबाबत 2 मे 2023 रोजी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकार्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता मात्र या बदलीला स्थगिती हवी असल्याने मुख्याध्यापक व वरीष्ठ लिपिकांनी तक्रारदार शिक्षकासह अन्य शिक्षकाकडे एका पगाराची रक्कम अर्थात 75 हजार रुपये लाच मागितली होती शिवाय वरीष्ठ लिपिक नरेंद्र वाघ यांच्या मोबाईलवरून संस्थाध्यक्ष विजय महाजन यांनी तक्रारदाराकडे दोघा शिक्षकांना एका महिन्याचा पगार लाचेपोटी हवा असल्याचे सांगितल्यानंतर मंगळवार, 13 जून रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवून पडताळणी करण्यात आली. बुधवारी आरोपी मुख्याध्यापक विनोद जाधव व वरीष्ठ लिपिक नरेंद्र जाधव वाघ यांनी लाचेपोटी 75 हजारांचा धनादेश महात्मा फुले हायस्कूलमध्येच स्वीकारल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली तर लाचेला संस्थाध्यक्षांनी प्रोत्साहन दिल्याने त्यांना अटक करण्यात आल्यानंतर संशयितांविरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक (रीडर) नरेंद्र पवारयांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, पोलीस निरीक्षक एस.के.बच्छाव, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, नाईक ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल सचिन चाटे तसेच एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, महिला हवालदार शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने यशस्वी केला.