शिर्डीत साईंच्या चरणी दान मोठ्या प्रमाणात वाढणार? ही आहे शक्यता

अहमदनगर : शिर्डीतील साई बाबांच्या चरणी दान करणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे. देशभरातील साईभक्तांसह विदेशातून मोठ्या प्रमाणात दान बाबांच्या चरणी अर्पण केले जाते. आता येणार्‍या काही दिवसांमध्ये बाबांच्या चरणी दान मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचा संबंध आरबीआयने २ हजार रुपयांची नोट बंद केल्याशी आहे.

२०१६ मध्ये मोदी सरकारने अचानक नोटा बंदीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बंद झालेलेया ५०० व १००० रुपयांच्या नोटा भाविकांना शिर्डीच्या साईबाबा मदिंरातील दानपेटीत टाकल्या होत्या. सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांच्या या नोटा आल्या होत्या. सर्व मुदत संपल्यानंतरही सुमारे ७१ लाख रुपयांच्या नोटा संस्थानकडे आल्या होत्या. आताही तसाच काहीसा प्रकार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आता दोन हजार रुपयांच्या नोटबंदीनंतर या नोटा मंदीरात दानपेटीत टाकणार्‍यांची संख्या वाढेल, अशी शक्यता असली तरी मागील वेळी झाला एवढा त्रास आणि गोंधळ यावेळी होण्याची शक्यता कमी आहे. नोटा बदलून घेण्यासाठी पुरेशी मुदत आहे. त्यामुळे लोक नोटा बदलून घेऊ शकतील.

शिवाय या नोटा दानपेटीत टाकल्या गेल्याच, तरीही फारसा त्रास होणार नाही. साईबाबा संस्थानकडे आलेल्या दानाची मोजदाद दर मंगळवारी आणि शुक्रवारी केली जाते. ही रक्कम लगेच बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे दोन हजारांच्या नोटा आल्याच तर त्या लगेलच बँकेत जाणार आहेत.