शिवजयंतीनिमित्त शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धा

भुसावळ : बालमनात शिवसंस्कारांची पेरणी करून शिवचरित्राचा जागर व्हावा यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारीचे औचित्य साधून भुसावळ शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धा 2024 ही विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमाची निगडित आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सदरची स्पर्धा शनिवार, दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजता भुसावळ येथील जामनेर रोडलगत असलेल्या म्युनिसिपल हायस्कूलमध्ये होणार आहे. मराठी माध्यमासाठी प्रथम गट पाचवी ते सहावी, द्वितीय गट सातवी ते आठवी, तृतीय गट नववी ते दहावी तर चतुर्थ गट अकरावी ते बारावी असा राहिल. तसेच हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमासाठी पाचवी ते नववी असा गट राहणार आहे. अभिवाचन परीक्षणाचे काम सुजाण परीक्षक करणार असून त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील. स्पर्धा पार पडल्यानंतर लागलीच बक्षीस वितरण केले जाईल. प्रत्येक गटातील तीन विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल तर स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी डॉ. जगदीश पाटील 8149498020 यांच्याशी संपर्क साधावा.

असा घ्यावा स्पर्धेत सहभाग – अभिवाचनासाठी इयत्ता चौथीच्या ‘शिवछत्रपती’ या पाठ्यपुस्तकाचा वापर करावा. ‘शिवछत्रपती’ या पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका पाठाची निवड करावी. एका विद्यार्थ्याला एका पाठाचे अभिवाचन पूर्ण होईपर्यंत वेळ दिला जाईल. पाठाचे अभिवाचन करायचे असल्याने पाठांतर करण्याची गरज नाही. इयत्ता चौथीचे ‘शिवछत्रपती’ हे पाठ्यपुस्तक उपलब्ध होत नसल्यास 9403718020 या व्हॉट्सअप क्रमांकावर Send Me Book असा मेसेज करावा. त्यानंतर आपणास पाठ्यपुस्तक Pdf स्वरूपात पाठवले जाईल. सदरचे पाठ्यपुस्तक हे मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेतून उपलब्ध असल्याने सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज संस्थेचे अध्यक्ष डी.के. पाटील, समन्वयक संजीव पाटील व सचिव डॉ. जगदीश पाटील यांनी केले आहे.

इयत्ता चौथीचे पाठ्यपुस्तक – महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती पुणे येथील मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बालभारतीच्या इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकाचे अभिवाचन विद्यार्थ्यांनी करावे आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिवरायांच्या इतिहासाची उजळणी होऊन त्यांच्या चरित्रातील प्रसंग वाचनाद्वारे प्रत्यक्षात डोळ्यासमोर उभे राहावे आणि त्यातून संस्कार व प्रेरणा मिळावी हा उद्देश स्पर्धेचा आहे. त्यासाठीच मुलांनी इयत्ता चौथीत शिकलेल्या बालभारती पाठ्यपुस्तकाचीच निवड अभिवाचन स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.

आकलनातून होईल उत्कृष्ट अभिवाचन – वाचनानंतरची पुढील पायरी समजण्याची असते. म्हणजेच आकलनानंतर ते सादरीकरण करणे म्हणजे अभिवाचन होय. इयत्ता चौथीत शिकलेले पाठ्यपुस्तक स्पर्धेच्या निमित्ताने अभिवाचन केले जाणार असून त्याद्वारे सर्जनशीलता वाढणार असल्याने विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी केले आहे.