छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ३९४ वा शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते.
यावेळी प्रथेप्रमाणे शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला. तसेच यानंतर बाल शिवाजी राजांची वाजत गाजत पालखी काढण्यात आली. तसेच किल्ल्यावर शिवाजी महाराजांची महती कथन करणारे पोवाडे, नाटकं यांचं सादरीकरण करण्यात आलं.
यावेळी बोलताना, अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जगभरात साजरी होत असते. पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिव छत्रपती म्हणजे युगपुरुष आणि युगप्रवर्तक राजे होते. त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी काम केले.
शिवछत्रपतींचा इतिहास जतन करण्यासाठी शासन कायम कटिबद्ध आहे. किल्ले रायगडाप्रमाणे किल्ले शिवनेरीचा देखील विकास करण्यात येत आहे. या पट्ट्यातील तीर्थक्षेत्र जोडण्याबाबत विचार होईल. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या हिरडा पिकांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या विशेष अधिवेशन घेण्यात येत असल्याचेही आवर्जून नमूद केले.
यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनावणे तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.