शिवप्रेमीनं शिवरायांसाठी उभारलं किल्ल्याचं घर

मालेगाव : येथील एका शिवप्रेमीने चक्क छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी व त्यांचे विचार भावी पिढीला समजण्यासाठी किल्ल्याचं घर बनवलं आहे. आता या शिवप्रेमीची आणि गड – किल्ल्याची प्रतिकृती असलेल्या अनोख्या घराची राज्यात चर्चा आहे.

डॉ.संतोष पाटील या शिवभक्ताने गड – किल्ल्यांची प्रतिकृती असलेले हे घर बांधले आहे. छशिवाजी महाराजांचा इतिहास, गड – किल्ले यांची माहिती येणाऱ्या पिढीला व्हावी, महाराजांचे विचार सदैव आपल्या पाठीशी रहावे,महाराजांचे विचार पुढच्या पिढीला आत्मसात व्हावे हा एकमेव उद्देश हे घर उभारण्यामागे असल्याचे डॉ संतोष पाटील सांगतात.

गुटखा व दारू पिऊन येणाऱ्यास घरात प्रवेश नाही

नुसतेच गड किल्ल्यासारख्या भिंती उभारल्या असे नाही तर या घराचे पावित्र्य राखण्याचे काम देखील डॉ.संतोष पाटील यांनी केले आहे. आपल्या घराला महाराजांचा दरबार म्हणून मानणारे डॉ. पाटील यांनी घरात प्रवेश करतेवेळी ‘ गुटखा व दारू पिऊन येणाऱ्यास घरात प्रवेश नाही ‘ असा मजकूर लिहून ठेवला आहे, तसेच घराच्या कंपाऊंड जवळच पादत्राणे काढण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे घराचे पावित्र्य जपण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला आहे. मंत्री दादा भुसे यांच्यासह अनेकांनी या घराला भेट देत कौतुक केले आहे.

एक वेगळाच आदर्श घेत त्यांनी हे घर तयार केले

घरात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ , छत्रपती संभाजी महाराज, सुभेदार मावळे तसेच गड-किल्ल्यांचे छायाचित्र लावले आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतःच्या घराला गड किल्ल्यासारखी रंगरंगोटी करुन एक वेगळाच आदर्श घेत त्यांनी हे घर तयार केले आहे. अतिशय सुंदर व सुबक पद्धतीने गड – किल्ल्यांची उभारणी करावी, तशी या घराची उभारणी केली असल्याने छ.शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव पाहण्यासाठी या घराला एकदा तरी भेट द्यायला हवी, असे आवाहन डॉ.संतोष पाटील यांनी केले आहे.