सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये ८ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ रोजी कोसळल्याची दुर्घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला. माही महिन्यांपूर्वीच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेचा अनेकांना धक्का बसला. या ठिकाणी ४५ किलोमीटर प्रति वेगानं वारे वाहत होते, त्यामुळं पुतळ्याचं नुकसान झाले, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आता याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरोधात FIR दाखल केली आहे.
या पुतळ्याचे कंत्राट मेसर्स आर्टिस्ट्री नावाच्या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीचे प्रोप्रायटर आणि शिल्पकार जयदीप आपटे आहेत, तर चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. आता या घटनेनंतर पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्या विरोधात FIR दाखल केली आहे. तर भारतीय नौसेनेने पुतळा कोसळण्याच्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
आता काय पुढे ?
राज्य सरकारने या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय नौसेना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी जाऊन तपासणी करणार आहे. राज्यातील विविध विरोधी पक्षांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली आहे. आता राज्य सरकार आणि संबंधित अधिकारी या प्रकरणाचा योग्यरित्या तपास करतील आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे.