शिवसेना फुटीचा निकाल : ‘शिवसेना’ शिंदेंची , ‘व्हीप’ भरत गोगावलेंचा .. आता पुढे काय ?

शिवसेना फुटीचा निकाल : शिवसेनेच्या इतिहासातील एक अत्यंत निर्णायक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या आमदारांना भरत गोगावलेंचाच व्हिप लागू होणार असल्याचा निकाल देखील विधानसभा अध्यक्षांनी दिला. सुनिल प्रभुंना बैठक बोलावण्याचा अधिकार नाही. बैठकीला अनुपस्थित राहिल्याच्या कारणास्तव 16 आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असा निकाल नार्वेकरांनी दिलाय. या निकालामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय. यानंतर आता उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.
मार्च 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करीत निकाल राखून ठेवला होता. त्यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या पारड्यात चेंडू टाकला अन् 10 जानेवारीचा अल्टिमेटम दिला होता. अशातच आता ठाकरे गटाकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. राहुल नार्वेकरांनी दोन्ही गटांच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे आता शिवसेनेचे दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरले आहेत. अशातच आता शिवसेनेच्या दोन्ही गटांना सुप्रीम कोर्टात आपणच खरी शिवसेना आहोत हे सिद्ध करावं लागेल. ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरले तर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली असती, त्यामुळे असा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचं म्हटलं आहे. सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असायला हवी होती, असं अनिल परब यांनी म्हटलं होतं. तर आम्ही सुप्रीम कोर्टात जावं आणि आणखी वेळकाढूपणा करावा हीच त्यांची इच्छा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे आता शिवसेनेचा निकाल ‘मनोमिलन’ होऊन निवडणुकीपूर्वी लागणार का? असा सवाल विचारला जातोय.

एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना दिलासा मिळाला असताना आता दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांनी देखील सुटकेचा श्वास घेतला आहे. महायुती सरकारला धक्का लागणार नसल्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. त्यामुळे आता अंतिम निकाल हा सर्वोच्च न्यायालयातच होणार का? असा सवाल देखील विचारला जातोय.

शिंदे गटाचे आमदार

एकनाथ शिंदे , शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव , संदीपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, संजय रायमूळकर, रमेश बोरनारे, महेश शिंदे.

ठाकरे गटाचे आमदार

अजय चौधरी, रवींद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, सुनिल राऊत, सुनिल प्रभू, भास्कर जाधव, रमेश कोरगावंकर, प्रकाश फातर्फेकर, कैलास पाटिल, संजय पोतनीस, उदयसिंह राजपूत, राहुल पाटील.