मुंबई | सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आज निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी अनिल बाबर यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
अनिल बाबर यांचा जन्म 7 जानेवारी 1950 रोजी सांगलीतील खानापूर तालुक्यातील गार्डी या गावी झाला. त्यांनी सरपंच पदापासून राजकारणाच्या विविध पायऱ्या पादाक्रांत केल्या. 22 व्या वर्षापासून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. सर्वातआधी ते 1990 साली आमदार म्हणून ते विधानसभेवर निवडून गेले.
1999 मध्ये पुन्हा त्यांनी आमदारकीची निवडणूक जिंकून विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर 2014 आणि 2019 अशा सलग दोन विधानसभा निवडणुका जिंकल्या. आमदार एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती.सांगली जिल्ह्यातील शिंदे गटाचे ते एकमेव आमदार होते. संघर्ष करुन त्यांनी इथपर्यंतचा प्रवास केला. त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने परिसरात आणि सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. राजकारणात सक्रीय असताना त्यांनी साखर कारखाने, जिल्हा बँकेवरही पद भूषवली.