मुंबई : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. मनोहर जोशी यांना सोमवारी सायंकाळी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मंगळवारी सकाळी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात पोहोचले आहेत.
गेल्या काही काळापासून मनोहर जोशी राजकारणात सक्रिय नव्हते. काल संध्याकाळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. मनोहर जोशी यांना मेंदूशी संबंधित व्याधी आहे. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर न्यूरोलॉजिस्ट डॉ. चारुलता संकला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. मनोहर जोशी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली होती. या काळात गजानन किर्तीकर यांच्यासह शिवसेनेतील काही ज्येष्ठ पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. मात्र, मनोहर जोशी उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहिले.