मुंबई । महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ॲडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.
मनोहर जोशी शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळ हळहळलं आहे. जोशी यांच्या निधनाचे वृत्त कळताच उद्धव ठाकरे यांनी आपला नियोजित बुलढाणा दौरा रद्द केला आहे. ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
मनोहर जोशींची कारकीर्द
मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. 1995 साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. बालपण-ध्येयाकडे खडतर सुरुवात सुसंस्कृत पण गरिब कुटुंबात जन्म झाल्यामुळे ‘कमवा आणि शिका’ या तंत्रानं लहानपणापासूनच संघर्ष त्यांच्या नशीबी होता. वडिलांबरोबर भिक्षुकी करून पैसे मिळवू लागले.
राजकीय कारकीर्द
प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केलं आहे.