मुंबई । लोकसभेची निवडणूक पुढच्या महिन्यातल्या १९ तारखेपासून ते १ जूनपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्रात पाच तर देशात सात टप्प्यांत निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळीही सुरु झाली आहे. अशातच शिवसेनेने आपल्या स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे. या यादीत सर्वात मोठे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे.
पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच शिवसेनेचा प्रचार करणार
शिवसेनेने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश आहे. खरे तर आजवर पंतप्रधान मोदींनी कधीही शिवसेनेचा प्रचार केलेला नाही. मात्र यावेळी ते पहिल्यांदाच हे काम करणार आहे. एकनाथ शिंदे गटाची खरी शिवसेना झाल्यानंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रचार करताना दिसतील.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह ४० स्टार प्रचारक नेतृत्व सांभाळतील
शिवसेनेच्या यादीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही समावेश आहे. शिवसेनेच्या भाजपसोबतच्या युतीमध्ये फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका मानली जात आहे. याशिवाय अजित पवार यांचाही या यादीत समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास आठवले, मिलिंद देवरा यांच्यासह एकूण ४० प्रचारकांची नावे या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.