मुंबई । लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली होती. त्यादिवशी सेन्सेक्स 4,389 अंकांनी घसरला होता. तर निफ्टी 1,379 अंकांनी घसरली होती. मात्र यानंतर पुन्हा बाजारात तेजी आली आहे. आज देखील बाजारात तेजी असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी निफ्टीने 23,420 चा विक्रमी नवा उच्चांक गाठला आहे. तर सेन्सेक्समध्ये (Sensex) 400 अंकांची वाढ झाली आहे.
दरम्यान, सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, टीसीएस आणि पॉवरग्रिड या कंपन्यांचे शेअर्स आघाडीवर होते. तर भारती एअरटेल, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स आणि अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीचे शेअर्स घसरत होते. आज सुरुवताली BSE सेन्सेक्स 222.52 अंकांच्या किंवा 0.29 टक्क्यांच्या वाढीसह 76,679 च्या पातळीवर उघडला. NSE चा निफ्टी 79.60 अंकांच्या किंवा 0.34 टक्क्यांच्या वाढीसह 23,344 च्या पातळीवर उघडला.
बीएसईचे मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर
बीएसईचे मार्केट कॅप 429.44 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. ही त्याची आत्तापर्यंतची सर्वाच उच्च पातळी आहे. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 22 शेअर्स वाढीसह व्यवहार करत आहेत तर 8 शेअर्समध्ये घसरण होत आहे. टाटा मोटर्सचे शेअर्स 1.40 टक्क्यांच्या वाढीसह अव्वल स्थानावर राहिले.