नंदुरबार : तळोदा तालुक्यातील मेंढवड येथे एकाचा शेकोटीत पडून जळून जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
तळोदा तालुक्यातील मेंढवड शिवारात धैर्य कन्स्ट्रक्शन कंपनीच्या डांबर प्लान्टच्या ऑफिससमोरील मोकळ्या जागेत शेकोटी पेटवून बसलेला वसंत साकऱ्या पाडवी (६०) रा.सोमावल खुर्द, ता.तळोदा असे मयताचे नाव आहे. सोमवारी सकाळी ही बाब निदर्शनास आली. शेकोटीच्या मध्यभागी आगीत पडून त्यात चेहऱ्यापासून पायापर्यंतचा भाग जळाल्याने जळून मृत्यू झाला आहे. याबाबत भंतीबाई वसंत पाडवी (५८) रा. सोमावल यांच्या खबरीवरून तळोदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत.
दरम्यान, मयताचे शव विच्छेदन घटनस्थळी जागेवरच तळोदा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. कैलास ठाकरे यांनी केले. श्वान पथक व फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पुढील तपासासाठी पाचारण करण्यात आले होते. शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.