शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! आज राज्यात पुन्हा धो-धो पाऊस बरसणार, जळगावमध्ये कसं असेल हवामान?

जळगाव/पुणे : गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी आलेल्या मुसळधार पावसाने अनेक धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने पाणी टंचाईची चिंता मिटली. परंतु या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. अशातच आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे आत हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची चिंता आहे.

या भागात कोसळणार पाऊस?
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात देखील घाट माथा परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात देखील आज जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह आणि विजांची कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना इशारा
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्याचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील, अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह उपनगरातही आज पावसाची शक्यता आहे. पुणे आणि ठाण्यासह संपूर्ण कोकणाला आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. नवी मुंबई आणि उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

जळगावात कशी राहणार स्थिती?
हवामान खात्याने आज जळगाव जिल्ह्याला अलर्ट दिला नसला तरी आज शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून सायकांळी काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल असा अंदाज आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील बहुतांश धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली. जळगाव शहरालाही पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरण देखील शंभरीच्या उंबरवठ्यावर आहे. यामुळे जळगावकरांची दोन वर्ष पाण्याची चिंता मिटली आहे.

सततच्या पावसाने पिकांचे नुकसान? 
सध्या राज्यासह जळगावात सुरु असलेल्या पावसामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसत आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजाने केली