जळगाव : खरीप हंगामाच्या र्श्वभूमीवर शेतकऱ्यांची लगबग सुरु असून या दरम्यान बोगस बियाणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार समोर येत असतात. त्यामुळे कृषी विभागाकडून नेहमीच जनजागृती केली जाते. मात्र तरी देखील बोगस बी बियाणे विक्री करणारी टोळी शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. असाच काहीसा प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला आहे.
विनापरवाना व अनधिकृत गोडावूनमधून रासायनिक खत व सेंद्रीय खताची गावेगावी, घरोघरी बिगर बिलाने विक्री होत असल्याची गुप्त माहिती समजल्यावरुन सदर प्रकारास आळा घालण्यासाठी विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक मोहन वाघ व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगांव संभाजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळयाचे नियोजन करण्यात आले.
जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जळगांव अरुण तायडे यांनी पाचोरा येथे येऊन उपविभागीय कृषि अधिकारी, पाचोरा नंदकिशोर नाईनवाड, कृषि अधिकारी, पंचायत समिती, पाचोरा मारुती भालेराव व कृषि पर्यवेक्षक अविनाश चंदीले यांना सोबत घेऊन पाचोरा तालुक्यातील जारगांव येथील मधुकर शंकर भोकरे यांच्या मालकीच्या गोडावूनची तपासणी केली असता तेथे विनापरवाना अनधिकृत खत साठा आढळून आला. याबाबत गोडावून मालकाची विचारपूस केली असता हे गोडावून काही दिवसांपुर्वी दिपचंद्र श्रीवास यांना भाडयाने दिल्याचे सांगीतले.
या विनापरवाना व अनधिकृत खत साठयाबाबत दिपचंद्र श्रीवास यांना मोबाईलद्वारे संपर्क साधुन गोडावून व कंपनीचा परवाना मागीतला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. या गोडावून मध्ये रुपये २,३८,६२९/- किमतीचा ६.७८ मे. टन खत साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत रात्री उशीरापर्यंत खत नियंत्रण आदेश १९८५ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार पाचोरा पोलीस स्टेशन येथे क्र.१५४/२०२३ दिनांक १७.०५.२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरीप हंगाम २०२३ मध्ये अनधिकृत, अवैधरीत्या व बिना बिलाने बियाणे व खतांची खरेदी करु नये. तसेच अशा कृषि निविष्ठांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय यांचे मोबाईल क्र. ०८९८३८३९४६८ व दुरध्वनी क्र. ०२५७-२२३९०५४ वर माहिती द्यावी. असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक मोहन वाघ आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.