जळगाव : महावितरणच्या कृषी वीज धोरणाअंतर्गत कृषिपंपाचे वीजबिल भरणावर ३० टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. येत्या ३१ मार्चला ३० टक्के माफीचीही मुदत संपणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुदत संपण्याची वाट न पाहता कृषी वीज धोरणात कृषिपंपाचे वीजबिल भरून थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
शासनाच्या महा कृषी ऊर्जा अभियानाअंतर्गत कृषी वीज धोरण २०२० राबविण्यात येत आहे. तीन वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या या धोरणाचे दुसरे वर्षही येत्या ३१ मार्चला संपणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारी थकबाकीमुक्तीची सवलतही ३१ मार्चपर्यंतच राहणार आहे. कृषी धोरणात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज व विलंब आकारत माफी, तर सुधारीत थकबाकीतही ३० टक्के सूट देण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महावितरणच्या कृषी धोरणाबाबत माहिती देऊन सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. धोरण पोहोचले आहे,परंतु ‘बिल आज भरू, उद्या भरू’च्या मानसिकतेमुळे दोन वर्षे निघून गेली असून, आता फक्त दुसऱ्या वर्षाचे ७ दिवस उरले आहेत.
जळगाव जिल्ह्यात धोरणापूर्वी शेतीची थकबाकी ३३८४.६० कोटी रुपये होती.दंड-व्याजातील सूट, निर्लेखन व बिल दुरुस्ती समायोजनातून ११७१.७४ कोटी रुपये माफ झाले आहेत. त्यामुळे सुधारित थकबाकीच्या २२१२.६८ कोटीच्या थकबाकीतही ३० टक्के थकबाकी माफ होत असल्याने, शेतकऱ्यांना सुधारीत थकबाकीच्या केवळ ७० टक्के रक्कम आणि सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल भरायचे आहे. आतापर्यंत योजना सुरु झाल्यापासून जळगाव जिल्ह्यात १ लाख १८ हजार ४७९ शेतकऱ्यांनी १५५ कोटी ८३ लाख रुपये भरले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनीही ३१ मार्चपर्यंतची वाट न पाहता आजच आपले वीजबिल भरून सवलतीसह थकबाकीमुक्तीचा लाभ घयावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा उन्मेश पाटील यांच्या नावे असलेल्या दरेगाव (ता.चाळीसगाव) येथील कृषिपंपाचे २६ हजार ६५० रुपयांचे संपूर्ण बिल भरून कृषी वीज धोरणाचा लाभ घेत ते थकबाकीमुक्त झाले. खा.पाटील यांचे वडील भय्यासाहेब पाटील यांनी बिलाची रक्कम महावितरण कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केली.