जळगाव । राज्यात सध्या अवकाळी पावसानं थैमान घातलं असून याचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र शेतकऱ्याचं संकट इथंच संपलेलं नाही. पुढील तीन दिवस राज्यातील विदर्भासह खान्देशात जोरदार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात मिचांग हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात अवकाळी पावसाचा इशारा संपूर्ण विदर्भातील 11 आणि खान्देशातील नंदुरबार, धुळे आणि जळगांव अशा तीन जिल्ह्यासहित एकूण 14 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढील तीन दिवस म्हणजे 1 डिसेंबरपर्यंत कायम आहे. तर मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यासहीत उर्वरित महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात मात्र शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर पर्यंत ढगाळ वातावरणासहित अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही कायम आहे.