जळगाव । शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवणारी एक बातमी आहे. जळगावसह राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होणार आहे. हवामान खात्यानं जळगाव जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. आज मंगळवारी जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात मात्र सुरुवातीला पाऊस झाल्यांनतर गणेशोत्सव काळात व गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठराविक तालुक्यांमध्ये झाला. आता मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असून यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने जळगाव जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज मंगळवारपासून आगामी तीन दिवस जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. २९ पर्यंत ढगाळ वातावरण व मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यात राहणार आहे.
वातावरणात आर्द्रता वाढल्याने उकाड्यात वाढ
जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. जळगाव शहराच्या तापमानात देखील वाढ झाली असून, सोमवारी जळगाव शहराचा पारा ३४.८ अंशांवर पोहोचला होता. त्यात ढगाळ वातावरणदेखील कायम राहिल्यामुळे वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण ८३ टक्के झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला होता. दरम्यान, आज मंगळवारी पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना पाऊस झाल्यानंतर उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो. मात्र या पावसामुळे काढणीवर आलेला खरीप हंगामातील पिके खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.