शेतकऱ्यांनो सावधान! आज धुळे, नंदूरबारमध्ये अवकाळीचा यलो अलर्ट, जळगावात…

धुळे । राज्यावर असलेलं अवकाळी पावसाचं संकट अद्यापही कायम आहे. मागील तीन चार दिवसांपासून काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना मोठा फटका बसत आहे. अशातच राज्यातील काही भागात पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

हवामान खात्याने आज (ता. ८) उत्तर महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर धुळे आणि नंदूरबारमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, तापमानात घट झाल्याने महाराष्ट्रातील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाच्या तुरळक सरी कोसळतील. पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर भागात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जळगावात गारठा वाढणार
दरम्यान, जळगाव जिल्ह्याला उद्या म्हणजेच ९ जानेवारीला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या चार पाच दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकाला मोठा फटका बसलाय. अवकाळीमुळे तापमानाचा पारा घसरला असून यामुळे थंडी वाढली आहे. पुढील तीन दिवसात आणखी थंडी वाढणार आहे.