नंदुरबार : खरीप हंगामाची तयारी सुरू असतानाच बोगस बियाण्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. शहाद्यात नऊ लाख रुपये किमतीचे बोगस एचटी-बीटी बियाणे आढळून आले असून कृषी विभागाने ते जप्त करुन संबंधितांवर कारवाई सुरू केली आहे.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची बियाणे खरेदी सुरू झाली आहे. विशेषत: या भागात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. त्यातब्ब्ल मुळे बोगस बियाणे विक्री करणारे संधी साधतात. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने गोपनीय माहितीनुसार काही ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. कृषी विभागाचे जिल्हा गुण नियंत्रक अधिकारी नरेंद्र पाडवी तसेच तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे व कृषी अधिकारी योगेश हिवराळे यांनी सारंगखेडा, ता.शहादा येथील एका कृषी विक्रेत्याकडे शुक्रवारी तपासणी केली असता तेथे नऊ लाख रुपये किमतीचे बोगस एचटी-बीटी बियाणे आढळून आले. यासंदर्भात मुद्देमाल जप्त करुन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून त्याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.