शेतकऱ्यांसमोर पिके जगवण्याचे मोठे आव्हान; मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

मुंबई : अमरावती जिल्ल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मोबदल्याची रक्कम न मिळाल्याने मंत्रालयात आंदोलन केले. १०३ दिवस उपोषण सुरु होते. आज आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी मंत्रालयात जाळीवर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अधिकारी आणि प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून आणि न्याय मागूनही आम्हाला कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता.

यावर नीती आयोगाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदे म्हणाले, “अप्पर-वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा झाली आहे. दादा भुसे, जलसंपदा विभागाचे अधिकारी, अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांना सूचना दिल्या आहेत. १० ते १२ दिवसांमध्ये याबद्दल महत्वाची बैठक होईल. बैठकीत सर्व आढावा घेऊन धरणग्रस्तांना न्याय दिला जाईल.

राज्यात काही भागात अजूनही पाऊस नाही, ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही. पण येत्या काही दिवसांत पाऊस पडेल, तसा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तरीही राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.