शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठवडाभरात हरभऱ्याचा भाव ‘इतक्या’ रुपयांनी वाढला

जळगाव । जिल्ह्यात कापूस हंगाम केव्हाच संपला तरी शेतकऱ्यांच्या कापसाला अद्यापही मागणी नाही. व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षाही कमी दरात कापूस खरेदी केला जात असल्याने कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र दुसरीकडे यंदा हरभऱ्यासह तुरीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवडाभरातच हरभऱ्याच्या भावात ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे ५,८०० रुपयांवर असलेले हरभऱ्याचे दर ६ हजारांपुढे गेले. हरभऱ्याला मागणी कायम असल्याने आगामी काही दिवसांत हरभऱ्याचे दर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजेच हमीभावापेक्षाही हरभऱ्याला ६०० ते ७०० रुपयापर्यंतचा अधिकचा भाव मिळत आहे. तुरीला देखील हमीभावापेक्षा अधिकचा भाव मिळतोय. त्यामुळे बाजार समितीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

जळगाव बाजार समितीत रब्बी हंगामातील धान्य खरेदीच्या पहिल्याच दिवशी हरभऱ्याला ५,८०० रुपयांचा भाव मिळाला होता. सध्या बाजार समितीमध्ये तुरीची आवकदेखील कायम असून, तुरीचे दर १० हजार रुपयांवर स्थिर आहेत. दुसरीकडे मात्र सोयाबीनच्या दरात मात्र दिवसेंदिवस घट होत आहे.

सोयाबीनचे दर सद्यस्थितीत ४४०० ते ४५०० रुपयांवर आले आहेत. तसेच सोयाबीनची आवकदेखील बाजार समितीत कमी झाली आहे. शासकीय खरेदी नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल कमी भावात विकावा लागत आहे.