धुळे : शेतात गुरे घुसल्यानंतर त्यास अटकाव केल्याच्या कारणावरुन महिला सरपंचांला आणि त्यांच्या मुलाला काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना शिरपूर तालुक्यातील धनपूर गावात बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी थाळनेर पोलिस ठाण्यात आरोपी महिला व तिच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. धनपूर येथील महिला सरपंच सरला पांडूरंग धनगर (वय ५६) यांनी फिर्याद दाखल केली.
त्यानुसार, धनपूर शिवारात सरला धनगर यांचे शेत आहे. या शेतात संशयितांचे गाय वासरु शिरले. त्यामुळे पिकांचे नुकसान होत होते. हे नुकसान टाळण्यासाठी गाय वासरु काढून घेण्याचे सांगण्यात आले. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पडसाद हाणामारीत झाले. यात काठीचा वापर करण्यात आला.
यात महिला सरपंचासह त्यांच्या मुलगा देखील जखमी झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर थाळनेर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री ८ वाजता फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार, भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनेचा तपास पोलिस नाईक भूषण रामोळे करीत आहेत.
दरम्यान या घटनेमुळे गावात खळबळ उडालेली आहे. अद्याप कोणाला ताब्यात घेतलेले नाही.