उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये श्रद्धा वॉल्कर हत्या प्रकरणासारखे प्रकरण समोर आले आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या तरुणीची तिच्या प्रियकराने निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये ठेवून जंगलात फेकून दिला. आरोपी प्रियकराला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच डिसेंबर २०२३ मध्ये ही हत्या केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 जानेवारी रोजी शाहरुल नावाच्या महिलेने हरिद्वारच्या पटेल नगर पोलीस ठाण्यात आपली मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्यांनी सांगितले होते की त्यांची २४ वर्षांची मुलगी शाहनूर गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. ती डेहराडूनमधील संस्कृती लोक कॉलनी ISBT जवळ भाड्याच्या खोलीत राहात होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
अनेक दिवसांपासून मुलीचा शोध लागला नव्हता. त्यानंतर पोलिसांना डेहराडूनमधील अशरोरी जंगलात एक सुटकेस सापडली, ज्यातून दुर्गंधी येत होती. पोलिसांनी सुटकेस उघडली असता आत एक कुजलेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते. पोलिसांनी शवविच्छेदन केले तेव्हा असे आढळून आले की हा मृतदेह दुसऱ्या कोणाचा नसून त्याच मुलीचा आहे जिच्या हरिद्वारमधील पटेल नगर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती.