श्रद्धेसह देशभक्तीचा अनोखा मिलाफ; अडीच कोटी रुपयांच्या नोटांसह नाण्यांनी सजवले गणपती मंदिर

गणेश चतुर्थीचा सण आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी गणपती बाप्पांचे मंडप सजविण्यात आले असून सुबक मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. असाच एक सुंदर मंडप बेंगळुरूच्या श्री सत्य गणपती मंदिरात बनवण्यात आला आहे, जिथे भक्तांनी बाप्पांचा मंडप नाणी आणि नोटांनी सजवला आहे. हा मंडप अडीच कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, भक्तांनी ह्या मंदिरात तयार केलेला गणपतीचा मंडप केवळ पैशांनीच सजवला नाही तर त्यात देशभक्तीचा स्पर्शही दिलाय. नुकतेच चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर त्यांच मोहिमेतील विक्रम लँडरचा देखावा ह्यावर्षी मंडपात करण्यात आला आहे. दरम्यान मंडपात डझनभर नाण्यांचा वापर करून भारताचा नकाशा तयार करण्यात आल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. श्रीगणेशाची मूर्तीही नाण्यांनी बनवण्यात आली आहे.

हे सर्व व्यवस्थापन श्री सत्य गणपती शिर्डी साई ट्रस्ट करत असल्याचे मंदिराचे विश्वस्त सांगतात. ५, १० आणि २० रुपयांच्या नाण्यांशिवाय १०, २०, ५०, १००, २०० आणि ५०० ​​रुपयांच्या नोटांचाही देखाव्यासाठी आणि बाप्पाच्या मूर्तीच्या सजावटीसाठी वापर करण्यात आला आहे. त्याची एकूण किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे.

दरम्यान बेंगळुरूच्या जेपी नगरमध्ये असलेल्या या गणपती मंदिराच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. विश्वस्तांनी सांगितले की, मंदिर आणि परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. भाविकांसह सुरक्षा कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. मंदिरात नेहमीच मोठी गर्दी असते आणि ही कलाकुसर पाहण्यासाठी लोक लांबून येत असतात.

हा देखाव्यासाठी पैसे जसे महत्त्वाचे होते. तसेच शारीरीक श्रम करणारे कारागिर ही तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच सुमारे दीडशे कारागिरांनी हा देखावा तयार केला. आणि हा मंडप देखावा आणि मूर्ती तयार करण्यासाठी एका महिन्याहून अधिक काळ लागल्याची माहिती विश्वस्तांनी दिली. गणपतीच्या मूर्तीशिवाय जय कर्नाटक, नेशन फर्स्ट, विक्रम लँडर, चांद्रयान आणि जय जवान-जय किसान अशा घोषणा देणारी चित्रेही मंडपात लावण्यात आली आहेत.

तसेत या देखाव्याची आणि मूर्तीची सजावट सुमारे आठवडाभर ठेवली जाणार असून, दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना दर्शन घेता येईल, असे विश्वस्तानी सांगितले. कर्नाटकात सोमवारपासून गणेश चतुर्थी उत्सवाला सुरुवात झाली असून हजारो भाविक बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी व पूजा करण्यासाठी येत आहेत.