श्रीरामाच्या जयघोषात दुमदुमली सुवर्णनगरी

जळगाव : हजारो मुखांतून श्रीराम नामाचा होत असलेला जयघोष, ब्राम्हणवृंदांच्या वेद मंत्रोच्चाराच्या सोबतीला टाळ मृदूंग, ढोल ताशांच्या होत असलेल्या गजरात, हजारो हातांनी रामभक्त हनुमानाचे नाव घेत आपले लाडके दैवत प्रभू श्रीरामांचा कार्तिकी प्रबोधनी एकादशीचा रथ दुपारी ठिक 12.53 ला ओढला आणि श्रीरामाची उत्सवमूर्ती नगर भ्रमणाला निघाली. जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेल्या श्रीराम मंदिर संस्थानाच्या श्रीराम रथोत्सवास मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला.

मंगेश महाराज यांनी केले रथाचे पूजन
श्रीराम मंदिर संस्थानाचे गादीपती मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते पहाटे चार वाजता काकड आरती, प्रभू श्रीरामांच्या उत्सव मूर्तीस महाभिषेक, सकाळी सात वाजता महाआरती करण्यात आली. सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत सांप्रदायिक परंपरेच्या भजनानंतर मंदिराच्या प्रांगणात सकाळी साडेदहा वाजता श्रीराम रथाचे महापूजन वंशपरंपरेने श्रीराम मंदिर संस्थांचे प्रमुख विश्वस्त, विद्यमान पंचम गादीपती हरिभक्ती परायण मंगेश महाराज जोशी (श्री अप्पा महाराजांचे पाचवे वंशज) यांचे शुभ हस्ते व शहरातील समस्त ब्रह्मवृंद मंडळी यांच्या वेद मंत्र घोषात संपन्न झाले. यानंतर मंगेश महाराज जोशी यांनी रथासह रथाच्या चाकांचे पूजन करून वंदन केले. त्यानंतर मुख्य मंदिरातील सर्व देवदेवताची पूजा व महाआरती करून श्रीरामांच्या पंचधातूच्या उत्सवमूर्तीस मंदिरातून वेदमंत्रोच्चारात बाहेर आणून रथात विराजमान करण्यात आले. यावेळी उपस्थित हजारोच्या जनसमुदायाने प्रभू श्रीरामांची महाआरती केली. संस्थान तर्फे उपस्थित प्रमुख अतिथी व रथोत्सवाचे मानकरी, सेवाधारी यांचा रूमाल, श्रीफळ व टोपी देत सत्कार करण्यात आला.

हजारो हातांनी ओढला रथ
रथावर वहनोत्सवातील गरुड, मारुती, अर्जुन, दोन घोडे इत्यादी मुर्त्या फुलांच्या माळांनी सजवून ठेवण्यात आल्या होत्या. रथाच्या अग्रभागी सनई ,नगारा, चौघडा, झेंडेकरी, वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ, श्रीराम भजनी मंडळ तसेच खेड्यांवरील भजनी मंडळी, श्री संत मुक्ताबाईंच्या पादुका असलेली पालखी व त्यामागे श्रीराम रथ असा भव्य दिव्य जलग्राम नगर दिंडी प्रदक्षणा म्हणजेच रथयात्रेस दुपारी 12.53 ला श्रीरामांच्या जयघोषात ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान येथून मार्गस्थ झाला. आणि लाखो भक्तांचे डोळे सुखावले. गृहिणींनी हाताच आरतीचे ताट, केळे, पेढे घेवून रथासह रथात थाटात विराजमान झालेल्या रामरायाच्या मूर्तीचे औक्ष्ाण करून सुखा समाधानाचे दान देण्याचे साकडे घातले.

फुलांचा वर्षाव
रथ जसा जसा पुढे पुढे जात होता तस तसे गल्लीतील दोन्ही बाजुला असलेल्या इमारतीतील पोर्चमधून भाविकांनी रथावर व रामभक्तांवर फुलांच्या पाकळ्याचा वर्षाव केला.

रांगोळ्या, पताकांनी सजले शहर
रथ मार्गावर विविध ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तर भगव्या पताकांनी परिसर सजविण्यात आला होता. विविध चौकात शहरातील भाविकांनी श्रीराम रथाच्या स्वागताच्या कमानी उभारल्या होत्या. श्री राम मंदिरापासून निघालेला रथ भोईटेगढी, आंबेडकर नगर, तेली चौक, श्रीराम मंदिराचे मागील गल्लीतून, रथ चौक मार्गे, बोहरा गल्ली, दाणा बाजार, अन्नदाता हनुमान मंदिरमार्गे, चैतन्य मेडिकल समोरून, प्रकाश मेडिकल, घाणेकर चौक, सुभाष चौक, सराफ बाजारातील श्री महालक्ष्मी मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम झाला. तेथून रथ श्रीमरी माता मंदिर भिलपुरा मार्गे भिलपुरा येथील संत आप्पा महाराजांचे परममित्र श्री संत लालशहा बाबा यांच्या समाधीस्थळी आला. तेथे श्रीराम रथाचे सेवाधारी रामसेवकांनी लालशहा बाबा यांच्या समाधीवर पुष्पहाराची चादर अर्पण करून त्यांना रथोत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण देत रथ पुढे बालाजी मंदिर मार्गे, रथ चौकात रात्री बारा वाजता परत आला. श्रीरामांच्या उत्सव मूर्तीस पालखीत ठेवून वाजत गाजत श्रीराम मंदिरात आणण्यात आली. प्रभू श्रीराम चंद्रांची शेजारती होत रथाची विधीवत समाप्ती झाल्याचे गादीपत मंंगेश महाराज जोशी यांनी जाहिर केले.

या मान्यवरांची होती उपस्थिती
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, केशव स्मृती सेवा समुहाचे अध्यक्ष्ा भरतदादा अमळकर, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष्ा अशोक जैन, माजी महापौर ललित कोल्हे, माजी नगरसेवक सुनील खडके, विष्णू भंगाळे, ॲड. सुचिता हाडा, भाजपच्या जिल्हाध्यक्ष्ाा जयश्री बेंडाळे, माजी महापौर सीमा भोळे, जयश्री महाजन, गोदावरी फऊंडेशनच्या डॉ. केतकी पाटील, पिपल बँक अध्यक्ष अनिकेत पाटील, श्रीराम मंदिर संस्थांचे समस्त विश्वस्त मंडळी, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, संजय चौधरी, सदस्य शैलेश पाटील, भानुदास चौधरी, विलास चौधरी, दादा नेवे, शिवाजी भोईटे, सुजित पाटील, दिलीप कुलकर्णी, डॉ विवेक जोशी, ॲड. सुशील अत्रे, शिवाजीराव भोईटे, विवेक पुंडे यांच्यासह अनेक सेवेकरी व नागरीक उपस्थित होते.

सुभाष चौकात भाविकांचा महापूर
दुपारी पाच वाजेच्या सुमारास रथ सुभाष चौकात आला. यावेळी शहराच्या उपनगरातील नागरीकांनी श्रीरामाच्या उत्सवमूर्तीचे रथासह दर्शन घेण्यास गर्दी केली. रथातून भाविकांवर केळ्यांच्या प्रसादाची उधळण केली जात होती. तर विविध ठिकाणी सामाजिक संस्थांनी केळे व साबुदाण्याच्या खिचडीचे मोफत वाटप केले.

डोळ्यांची नी मनाचे पारणे फेडणारा उत्सव
गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या वहनोत्सवासह श्रीरामाच्या रथाच्या दर्शनासाठी लाखो भाविक आतुरतेने वाट पाहत होते. आजच्या या रथोत्सवाचे दर्शन झाल्याने कार्तिकीस पंढरपूर यात्रेचे पूण्य मिळाल्याचे भाव अनेक भाविकांच्या चेहऱ्यावर दिसत होते.