जळगाव । राष्ट्रवादी शरद पवार गटाचा रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अखेर ठरला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उद्योजक तथा मराठा चेहरा म्हणून श्रीराम पाटलांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले असल्याची माहिती समोर आलीय. रावेरच्या जागेचा तिढा सोडण्यासाठी काल पुणे येथे शरद पवार यांच्या उपस्थिती बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्यातील माजी आमदार सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील,महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.
या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर श्रीराम पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले. विशेष काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन रावेर लोकसभा मतदार संघातून उमेदवारीसाठी तयारी दाखवली होती. श्रीराम पाटील यांनी अखेर भाजपाला सोडचिट्ठी देऊन शरद पवार गटात प्रवेश केला.
रावेरमध्ये शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून त्यांच्या नावाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून वेगवेगळे नाव उमेदवारीसाठी समोर येत होते. अनेक अनेक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून खुद्द उमेदवारी जाहीर करून प्रचाराची सुरुवात तथा मिरवणूक देखील काढली होती. मात्र ऐन वेळेस श्रीराम पाटील यांचे नाव समोर आल्याने पक्षश्रेष्ठींकडून यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.