मुंबई : खासदार संजय राऊत यांनी २३ सप्टेंबर, २०२३ रोजी संसदेत भाषण करताना मोदींविरोधात टीका केली. भारताच्या विज्ञानाचा आणि तंत्रज्ञान प्रगतीचा उपयोग मोदी राजकारणासाठी करतात अशी टिका त्यांनी केली. यावर संजय शिरसाट यांनी प्रत्युतर देऊन राऊतांकडे लक्ष देऊ नका असे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सक्षम भारत बनवायचा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशिवाय देश मोठा होणार नाही. पण आपण करोना काळात मोदींच्या नेतृत्वाखाली थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा या गोष्टी केल्या, अशी टीका संजय राऊतांनी केली.
यावर प्रत्युतर देताना आमदार संजय शिरसाट म्हणाले की, “संजय राऊत कधी काय बोलतील याचा नेम नाही. त्यांचा फक्त आगीत पेट्रोल ओतायचा धंदा आहे. आग कशी लावायची हे संजय राऊतांकडून शिकावे. यामुळेच त्यांनी स्वतःच्या पक्षाला पण फोडले आणि राष्ट्रवादी पण फोडली. त्यामुळे अशा लोकांच्या विधानाकडे लक्ष देण्यात काही अर्थ नाही.”