संजय राऊतांनी स्वत:ची तुलना केली वीर सावरकरांशी!

तरुण भारत लाईव्ह । नाशिक : वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिध्द असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे काल खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतल्यानंतर थुंकले होते. राऊतांच्या या कृतीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असतांना आता त्यावर त्यांनी नाशिकमध्ये त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी माफी मागण्याचा प्रश्‍नच येत नाही, अशी भुमिका मांडत त्यांनी त्याच्या कृत्याची तुलना थेट स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी केली आहे.

नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधतांना राऊत म्हणाले की, मी कुणावरही थुंकलो नाही. वीर सावरकरांना एकदा कोर्टात आणलं गेलं. वीर सावरकरांनी पाहिलं की त्यांची माहिती देणारा बेईमान कोपर्‍यात उभा आहे. त्याच्याकडे बघून वीर सावरकर थुंकले होते. त्यामुळे बेईमान्यांवर थुंकणं ही हिंदू संस्कृती, हिंदुत्वाचा एक भाग आहे. मी कुणावरही थुंकलो नाही. पण वीर सावरकरांनीही बेईमान्यांवर थुंकणं ही संस्कृती असल्याचं दाखवून दिलं होतं. इतिहासात त्याची नोंद आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मी वीर सावरकरांचा भक्त आहे. लोकमान्य टिळक, बाळासाहेब ठाकरे यांच्या चांगल्या गोष्टी आम्ही घेत असतो. चीड आणि संताप कोणत्याही प्रकार व्यक्त होऊ शकतो. मी थुंकलो कुठे मला दाखवा. माझा दाताचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्यातून व्यक्त झालेली कृती आहे. त्यांना असं वाटतं आहे की लोक आमच्यावर थुंकत आहेत. त्यांची ही मानसिकता आहे. त्यांना झोपेतही वाटतं ही लोक आमच्यावर जोडे मारत आहेत. हे खरं आहे लोक त्यांच्यावर थुंकत आहेत. मी कशाला ते व्यक्त करु? असंही संजय राऊत म्हणाले आहेत.