संजय राऊत आणि नाना पटोले हे बोलघेवडे; फडणवीसांनी काढली इज्जत

अहमदनगर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सातत्याने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असतात. त्यांच्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंसह विरोधकांवर टीकास्त्र सोडले. संजय राऊत आणि नाना पटोले हे बोलघेवडे असून आम्हाला खूप काम आहे, त्यामुळे त्यांना उत्तर देत नाही अशी टीका फडणवीसांनी अहमदनगर येथे पत्रकार परिषदेत बोलतांना केली.

मंत्रिमंडाचा विस्तार झाल्यानंतर राज्यातील सरकार पडेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, शिवसेना-भाजपमध्ये समन्वय असून आमच्यात कोणतीही अडचण नाही. गजानन कीर्तीकर यांनी २२ जागांवर दावा केला नसून आमच्या युतीत कोणतेही मतभेद नाहीत, असंही त्यांनी म्हटलं. तर संजय राऊतांच्या प्रश्नावर बोलताना ‘कोण संजय राऊत?’ अशा शब्दांत फडणवीसांनी बोचरी टीका केली.

युतीत कोणतेही वाद नसून जरी असले तरी चहाच्या कपाएवढे आणि ते शमले आहेत. शिवसेना व भाजप या दोघांमध्ये कोणतेही वाद नाहीत. आमच्यामध्ये पूर्ण समन्वय आहे. लोकसभेच्या जागा वाटपाबाबत आम्ही दोघं बसून निर्णय घेऊ. तसेच महाविकास आघाडीमध्ये काहीही झालं तरी त्याचं खापर भाजपवर फोडलं जातं, इतरांच्या घरी मुलगा झाला तरी त्यात आमचा हात आहे असं म्हणू नये म्हणजे झालं, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.