जळगाव : कोलकाता येथे एका डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशातच पुन्हा जळगाव जिल्ह्यात संतापजनक घटना समोर आली आहे. एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्या खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तपासचक्रे फिरवत संशयितास ताब्यात घेतले आहे.
चोपडा तालुक्यातील एका गावानजीक शेतात एक परिवार वास्तव्याला आहे. यातील १२ वर्षीय मुलगी ही शनिवारी सायंकाळी घराजवळ असताना संशयित तेथे आला. त्याने या मुलीला शेताकडे नेत अत्याचार केला. त्यानंतर डोक्यात दगड टाकून तिचा खून केला.
ग्रामस्थांनी पोलिसांना घटनेची माहिती कळवली. यानंतर चोपडा शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तसेच एलसीबीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली.
बालिकेचा मृतदेह रात्री उशिरा चोपडा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी रात्रीच घटनास्थळाची पाहणी केली.
या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तपासचक्रे फिरवत संशयितास ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.