जळगाव : यावल तालुक्यातील चितोडा येथील एका तरूणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दुर्गेश संतोष किनगे (२३) असे मयत तरुणाचे नाव आहे. दोन महिलासह पाच जणांनी अज्ञात कारणावरून चापटाबुक्क्यांनी मारहाण करत धमकी दिल्याने या तरुणाने हाक्कादायक निर्णय घेतल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांत ५ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील चितोडा येथे दुर्गेश संतोष किनगे (२३)हा तरुण वास्तव्यास आले. दरम्यान, या तरूणास अज्ञात कारणावरून गावातील २ महिलासह भास्कर आनंदा जंगले, भूषण भास्कर जंगले, ज्ञानेश्वर भास्कर जंगले यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या पुर्वी त्याच्या घरासमोर चापटा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली तसेच तु गावातून निघून जा अशी धमकी दिली.
युवकाने घाबरून जात यावल शिवारातील देविदास तुकाराम पाटील यांचे गट नंबर ५५७ चे शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. प्रथम गुरुवारी दुपारी चितोडा गावाचे पोलीस पाटील पंकज वारके यांचे खबरी वरून यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, सायंकाळी उशिरा मयताचे वडील संतोष किनगे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दोन महिलासह पाच संशयीता विरुद्ध तरुणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे घटनेचा तपास पुढील तपास करीत आहेत.