संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, काय आहे कारण?

हिंगोली : आमदार संतोष बांगर यांच्यावर कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने ते अडचणीत सापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कावड यात्रेत तलवार फिरवल्याने तसेच परवानगी न घेता डीजे लावल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी काल हिंगोलीमधील कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिरापासून कावड यात्रा काढली होती. हजारो कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी संतोष बांगर यांना एकाने तलवार दिली. बांगर यांनी ती तलवार बाहेर काढून हवेत भिरकावली.

याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कळमनुरी येथील पोलिस कॉन्सटेबल सतीश शेळके यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची परवानगी न घेता डीजे लावल्याने व हवेत तलवार नाचवल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.