जळगाव : देशाला समृध्द आणि स्वयंपूर्ण करण्यास हातभार लावतील अशा नवनवीन कल्पना आणि नाविन्यांचे प्रयोग विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेच्या निमित्ताने बघायला मिळाले. ही तरुणाई उद्या देशाला निश्चित महासत्ता बनवेल याची ग्वाही दिसून येत होती.
निमित्त होते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेचे. विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहात ५६३ विद्यार्थ्यांनी ३४७ प्रवेशिकांमधून ३०६ पोस्टर्स व ४१ मॉडेल्सचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगून विज्ञान, कृषी, पशुसंवर्धन, मानवविज्ञान, आंतर विद्याशाखीय अभ्यास, वाणिज्य व व्यवस्थापन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, सामाजिकशास्त्रे, फार्मसी आदी विषयांमधील पोस्टर व मोड्युल्सची मांडणी सभागृहात केली होती. पदवी, पदव्युत्तर, संशोधन व शिक्षकेतर कर्मचारी या गटातील स्पर्धक मोठया उत्साहाने आपले संशोधन सादर करीत होते. त्यांच्या या संशोधनात विद्यार्थ्यांनी नाविन्यावर भर देत भविष्यकाळाची चाहूल लक्षात घेऊन पोस्टर्स व मॉडयुल्स सादर केले आहेत.
या स्पर्धेतन नैसर्गिक साधनांचा वापर करुन फेस वॉश व स्क्रब तयार करणे, बसची सुरक्षितता, नव्या पध्दतीचे स्पीड ब्रेकर, स्मार्ट पध्दतीचे उपस्थिती पत्र, आदिवासी वनौषधी, फिरते हिरकणी कक्ष, आर्टीफिशीयल ग्राउंड वॉटर रिचार्ज सिस्टीम, पॅसीव्ह डायनॅमिक स्टेबल वॉकर, ऑईल रिकव्हरी, कार्बन क्रेडीट, तत्काळ दूध तपासणीची आधुनिक पध्दतीचे उपकरण, टेकडी व नदीच्या पाण्यापासून विद्युत निर्मितीचा प्रकल्प, पॅराडाईझ लॉस्ट महाकाव्यावर आधारीत निसर्गाचे संवर्धन, नंदुरबार जिल्ह्यातील अतीदुर्गम भागातील शिक्षणासाठीची आवश्यकता, मेडीकल पोर्टेबल बूट कम सॅन्डल, वैद्यकीय व औषधीनिर्माण क्षेत्रासाठी पेपरलेस कामकाजाचे सॉफ्टवेअर, टूथ ब्रश निर्जंतूकी करणाचे साधन, विघटनशील मल्टींग शीट शेतातील कामासाठी, क्युआर कोडव्दारे कुत्र्यांना लसीकरणाची प्रोफाईल, विना विद्युत मोटर शेतात पाणी पुरवठ्याचा प्रकल्प, विविध प्राण्यांपासून शेतातील पिकांचे विद्युत रहीत रक्षण प्रकल्प, नैसर्गिक पध्दतीने जल शुध्दीकरण, माती परीक्षण करुन आधुनिक पध्दतीने माती संरक्षित करणे व तीची क्षमता विकसित करणे, पर्यावरण शिक्षण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, संगणकाचा तंत्रज्ञानात वापर, नैसर्गिक द्रव्यांपासून पॉलिमर रेझिन, सायबर सुरक्षितता, आधुनिक शेती, बायो इथॉनॉल, हिंदी कादंबऱ्यांतील वेश्यांचे चित्रण, आंबेडकर काव्यातील मानवतावाद आदी विषयांवर पोस्टर व मॉड्युल्सव्दारे संशोधनाचे निष्कर्ष विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले.